*किवळे स्मशानभूमीच्या दुर्लक्षित अवस्थेला कंटाळून ग्रामस्थ आक्रमक — महापालिकेच्या नावाने श्राद्ध घालून अनोखे आंदोलन*
पिंपरी चिंचवड :

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून स्मशानभूमीच्या विकासाकडे सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या किवळे ग्रामस्थांनी आज अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला. महापालिकेच्या नावाने श्राद्ध घालून उपरोधिक आंदोलन करण्यात आले.
किवळे गावाचा महापालिकेत समावेश होऊन बराच काळ लोटला असला तरी, स्मशानभूमीचा विकास अद्याप झालेला नाही. शेजारील नदीपात्रातील वाढते पाणी, चिखलमय जागा, जलपर्णीचा विळखा, महिलांसाठी शौचालयाचा अभाव, तुटलेले नळ, खचलेले रस्ते, अपुरा प्रवचन मंडप — या साऱ्यांमुळे स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
याशिवाय, स्मशानभूमी ज्या जागेवर आहे, त्या जागेचे आरक्षण जुने असूनही संबंधित मालकाला अद्याप मोबदला मिळालेला नाही. मयतांसाठी केवळ दोनच जाळ्या असल्याने गावकऱ्यांना देहूरोड कॅन्टोन्मेंटवर अवलंबून राहावे लागत आहे.
या सर्व परिस्थितीचा निषेध नोंदवण्यासाठी आज सकाळी ११ वाजता किवळे ग्रामस्थांनी महापालिकेच्या नावाने हिंदू पद्धतीने श्राद्ध घालून अनोखे आंदोलन केले. पिंडीला कावळ्यानेही स्पर्श केल्याने या आंदोलनाला एक उपरोधिक तरीही ठोस भावनिक अधोरेखा लाभली. या वेळी रावेत पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त ठेवला.
*महापालिकेचे लेखी आश्वासन — ‘दोन महिन्यांत कामे पूर्ण करू’*
या आंदोलनाच्या वेळी महापालिका ‘ब’ प्रभाग स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप खोत व अमोल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी लेखी आश्वासन देताना सांगितले की, सध्या ५० लाखांचा निधी मंजूर असून, दोन जाळ्या, महिलांसाठी चेंजिंग रूम, शौचालय, नळ दुरुस्ती, कचरा संकलन यांसारखी कामे तातडीने केली जातील.
इतर मोठ्या कामांसाठी सुमारे ६ ते ६.५ कोटी रुपये लागणार असून, जागा खरेदीसाठी मालकाला मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. एकंदर प्रकल्पासाठी निधी मंजूर होताच स्मशानभूमीचे सुशोभीकरण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या लेखी पत्रानंतर ग्रामस्थांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले.
*प्रमुख नेते, कार्यकर्त्यांची उपस्थिती*
या आंदोलनात माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, युवासेना मावळ अध्यक्ष राजेंद्र तरस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाप्पूसाहेब कातळे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे, शिवसेना उपशहरप्रमुख नवनाथ तरस यांच्यासह रवींद्र कदम, पंढरीनाथ सानप, राजू महाले, विश्वास आंबेकर, सुधीर तरस, रघु गव्हाळे, गणेश हिंगे, मेघराज तंतरपाळे, अजय बखारिया, शुद्धोधन वानखेडे, सुनील ननवरे, राजू पवार, नारायण खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.






