महा एआय शाळेचा मान नगरपरिषद शाळेला; संत ज्ञानेश्वर शाळेची निवड

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

राज्यात बंद होत असलेल्या सरकारी मराठी शाळा आणि घटती विद्यार्थी पटसंख्या या पार्श्वभूमीवर काही शाळा आपल्या गुणवत्तापूर्ण कामगिरीने खासगी शाळांनाही मागे टाकत आहेत. अशाच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील निवडक तीन शाळांमध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाच्या पीएम श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक ६ चा समावेश झाला असून या शाळेला अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली आहे.

 

राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग आणि एचपी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणून संत ज्ञानेश्वर शाळेची निवड झाली आहे. या एआय लॅबची उभारणी पूर्ण झाली असून येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना एआय स्किल्सचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर आणि प्रशासन अधिकारी अनिता वैद्य यांनी दिली.

 

राज्य शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार ही प्रयोगशाळा सज्ज झाली आहे.

 

नवीन एआय प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्षिकांवर आधारित शिक्षण मिळणार आहे. तसेच विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंधित इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढविण्यासाठी विशेष वर्ग सुरू करण्याचेही नियोजन आहे. मुख्याध्यापक संजय चांदे आणि शिक्षकवृंदाच्या उपस्थितीत मानोशी डे, डॉ. ऋतूपर्णा मटकर आणि नवीन चावला या एआय तज्ज्ञांनी प्रयोगशाळेतील प्रणालीची यशस्वी चाचणी नुकतीच केली.

 

एचपी इंडिया कंपनीने या प्रकल्पाच्या प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली असून तज्ज्ञांकडून वर्षभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. वाय-फाय सुविधेसह २५ संगणक, डिजिटल बोर्ड आणि टीचर्स पोडियमने सुसज्ज अशी वातानुकूलित एआय लॅब १५ जूनपासून कार्यान्वित होणार आहे.

Advertisement

 

नगर परिषद शिक्षण समिती सभापती भारती धोत्रे यांनी या उपक्रमाचे स्वागत करत शाळेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे श्रेय शिक्षकांना दिले. राज्यस्तरीय निवड समितीने शाळेच्या सर्वांगीण कामगिरीची दखल घेत एआय लॅब मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे नगर परिषद शाळांची तंत्रज्ञानाधारित गुणवत्ता अधिक उंचावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, नवोपक्रमशीलता आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास होणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मत मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी व्यक्त केले. शिक्षकांनीही या संधीचे स्वागत करत विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

कोट :

“तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या शाळांमधील परिस्थिती प्रगतीपथावर आहे. गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी समर्पित शिक्षकवृंद, व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम आणि क्रीडा स्पर्धांतील राज्यस्तरीय यश यामुळे सरकारी शाळांविषयीचा संकुचित दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.”

— गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी

 

कोट २: प्रशासन अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया…

 

“आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे अत्यंत आवश्यक आहे. पीएमश्री संत ज्ञानेश्वर शाळेत सुरू होणारी एआय लॅब विद्यार्थ्यांना भविष्यातील डिजिटल आणि तांत्रिक क्षेत्रासाठी सक्षम बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. नवीन शैक्षणिक धोरणानुसारही तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर विशेष भर दिला आहे.

या लॅबच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता विकास, मशीन लर्निंग, डेटा सायन्स यासारख्या कौशल्यांची ओळख होणार आहे.

नव्या युगाची सुरवात झाली असल्याने भविष्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत व त्यासाठी या माध्यमातून लहान वयातच योग्य दिशा मिळणार आहे.”

– अनिता वैद्य, प्रशासन अधिकारी, न.प. शिक्षण मंडळ


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page