श्रीक्षेत्र देहू येथे बीज सोहळ्या ची जय्यत तयारी इंद्रायणी पाणीवापरावर निर्बंध,संसर्गजन्य रुग्णांना प्रवेशबंदी

SHARE NOW

देहू, : संतपरंपरेचा अखंड नाद घुमविणाऱ्या श्रीक्षेत्र देहू येथे ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा भक्तिभावात संपन्न होणार आहे. राज्यासह परराज्यातून लाखो भाविक व वारकरी देहूत दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सुरक्षेसह स्वच्छतेच्या दृष्टीने कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. इंद्रायणीच्या तीरावर भक्तीला शिस्तीची किनार देत पाणीवापरावर विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

 

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३३(१)(ड) व ३३(१)(ठ) अन्वये आदेश काढत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवरील पाणी पिण्यासाठी अथवा स्वयंपाकासाठी वापरण्यास मनाई केली आहे. भाविकांनी केवळ सार्वजनिक पिण्याच्या नळांचा वापर करावा.असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नदीपात्रात कपडे धुणे. अंघोळीदरम्यान साबण-डिटर्जंटचा वापर करणे किंवा पाणी दूषित होईल असे कोणतेही कृत्य करण्यास सक्त मनाई आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर अधिनियमाच्या कलम १३१ अन्वये कायदेशीर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Advertisement

 

दरम्यान, बीज सोहळ्यादरम्यान संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर आरोग्यदृष्ट्या अतिरिक्त खबरदारीही घेण्यात आली आहे. देहू नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्ते व जागांवर संसर्गजन्य रोग्यांनी येऊ नये, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. संबंधित क्षेत्रात कोणताही संसर्गजन्य रुग्ण आढळल्यास त्यांना नगरपंचायतीने उभारलेल्या स्वतंत्र शेडमध्ये विलगीकरणासाठी ठेवणे बंधनकारक राहील. आरोग्य पथके, स्वच्छता कर्मचारी व स्वयंसेवक यांची विशेष नियुक्ती करण्यात आली असून, गर्दी नियोजनासाठी पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

 

इंद्रायणीच्या पवित्र प्रवाहाला स्वच्छतेची कवच-कुंडले देत ‘हरिनामाचा मेळा, आरोग्याचा मेळावा’ अशी संकल्पना यंदा राबविण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसह पाण्याची स्वच्छता अबाधित ठेवणे हा आदेशांचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सर्व वारकरी.भाविक व स्थानिक नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page