शिवगर्जनेच्या जयघोषात कृष्णराव भेगडे स्कूलचा दुमदुमला परिसर
तळेगाव दाभाडे :

तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचालित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात आज शिवजयंती महोत्सव अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळेगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. श्री. संतोष हरिभाऊ दाभाडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. संदीपजी काकडे, संचालिका सौ. गौरी काकडे, उद्योजिका सौ. राजश्रीताई मस्के, माजी नगरसेविका मा. मंगलताई काकडे, श्री. सुभाष दाभाडे, शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत इत्यादी मान्यवरही उपस्थित होते.

शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री संदीप जी काकडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्याचबरोबर पालखी पूजनही करण्यात आले. यानंतर मराठमोळा बाज असलेला महाराष्ट्राचा अतिशय उत्साही खेळ प्रकार लेझीम घेण्यात आला. त्याचबरोबर नाटिका, नृत्य पोवाडा या विविध कलाविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले. या सर्व कलाविष्कारांमध्ये इ. नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. यानंतर शाळेतील शिक्षिका सौ. नीतू लाल, दिपाली पाटील व अंजली कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून शिवरायांचा प्रताप सांगितला. विद्यार्थी मनोगतातून देखील मराठी स्वराज्याचे वेगवेगळे पट उलगडून दाखवले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने सर्व परिसरात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता. कार्यक्रमात आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात आपण या मावळाच्या मातीत जन्मलो हेच आपले खूप मोठे भाग्य आहे, कारण याच मावळातून निर्माण झालेल्या मावळ्यांनी या स्वराज्याची शपथ शिवरायांबरोबर एकत्र घेतली आणि आपले हिंदवी स्वराज्य निर्माण केले. एवढा मोठा ऐतिहासिक वारसा घेऊन याच मातीत जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान आहे व आपल्याला देखील असावा असे त्यांनी सांगितले. आजच्या पिढीला या ऐतिहासिक सदगुणांची जोड मिळाली तर आपण भविष्यात खूप चांगले नागरिक होऊ असे त्यांनी सांगितले. यानंतर कार्यक्रमात शिवप्रतिमेची पालखी काढण्यात आली. ही पालखी शाळेपासून सुरु होऊन मनोहर नगर, श्री समर्थ नगर, मोहन नगर,आनंद नगर , वनश्री नगर मनोहर नगर या परिसरात काढण्यात आली. यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी संकल्प काळे, अथर्व हरवंदे, आराध्य फुके व स्नेहल मस्के यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केले. अशाच प्रकारे शिवजयंती महोत्सव उत्साह अभिमान आणि प्रेरणेच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.






