शिवजयंती उत्सव २०२६ तळेगाव दाभाडेत भव्य सोहळ्याचे आयोजन
तळेगाव दाभाडे: शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ (फाल्गुन कृ. तृतीया) तळेगाव दाभाडे येथील श्री शिवशंभू स्मारक संस्था व श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवप्रेमींसाठी श्री शिवजयंती उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक परंपरेला साजेशा विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांची रेलचेल यंदाच्या उत्सवात पाहायला मिळणार आहे.
उत्सवाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विधिवत जलाभिषेकाने होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून वैभवराव निंबाळकर (आयपीएस, डीआयजी सी.आर.पी.एफ., तळेगाव पुणे) उपस्थित राहून शुभहस्ते अभिषेक करणार आहेत. यावेळी शिवभक्तांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात वातावरण भक्तिमय होणार आहे.
यानंतर श्री शिवशंभू तीर्थावर पुष्पवृष्टी व अभिवादनाचा कार्यक्रम होईल. सकाळपासून विविध शिवज्योत मंडळांचे आगमन होणार असून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. सहभागी सर्व शिवपाईकांसाठी अल्पोपहार व चहापानाची विशेष व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शिवभक्तांमध्ये आपुलकी व एकोप्याचे वातावरण निर्माण होणार आहे.
सायंकाळी ५ वाजता ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर येथून भव्य-दिव्य शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. शोभायात्रेत विविध प्रकारचे पाच आकर्षक चित्ररथ, श्री शिवशंभू तीर्थाची भव्य प्रतिकृती, ढोल-ध्वज पथक तसेच वाद्यवृंदाचा दिमाखदार सहभाग असणार आहे. पारंपरिक पोशाखातील शिवपाईक, महिलांचे लेझीम पथक आणि युवकांच्या घोषणांनी संपूर्ण तळेगाव दाभाडे परिसर शिवमय होणार आहे.
शोभायात्रेची ग्रामप्रदक्षिणा पार पडल्यानंतर रात्री ९ वाजता श्री शिवशंभू तीर्थावर सांगता समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या शुभहस्ते सामूहिक शिववंदना, प्रार्थना व पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर सामूहिक महाआरती होईल. परिसर उजळून टाकणारी भव्य फटाक्यांची आतिषबाजी हा उत्सवाचा आकर्षणबिंदू ठरणार आहे.
शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे शहरात सर्वत्र सजावट, रोषणाई व शिवकालीन देखावे उभारण्यात येणार असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम व आदर्श राज्यकारभाराची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आयोजकांचा मानस आहे.
सर्व तळेगावकर नागरिक बंधू-भगिनींनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






