तळेगाव दाभाडे येथे प्रथम राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धा व विधी सहाय्य केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे –
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालय, विष्णुपुरी, तळेगाव दाभाडे येथे दिनांक ०४ एप्रिल २०२६ रोजी “कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे प्रथम राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धा – २०२६” तसेच महाविद्यालयातील विधी सहाय्य केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास न्यायक्षेत्र व शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या विधी सहाय्य केंद्राचे उद्दिष्ट ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, दुर्गम भागात कायदेविषयक जनजागृती करणे तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांविषयी जागरूक करणे हे आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना समाजाभिमुख कायदे शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होणार आहे.
“प्रथम राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धा – २०२६” आयोजित करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे देशभरातील कायद्याच्या विद्यार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रिया, युक्तिवाद कौशल्य, संशोधन क्षमता व व्यावसायिक नैतिकतेचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले –
प्रथम पारितोषिक – बालाजी लॉ कॉलेज, ताथवडे
द्वितीय पारितोषिक – अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ लॉ, पुणे
बेस्ट मूटर (उत्कृष्ट वक्ता)– अंशिका धवन (PDEA’s Law College, Pune)
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी स्पर्धेतील सर्व सहभागी संघांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विशेषतः विजेते, उपविजेते तसेच ‘बेस्ट मूटेर’ ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या उत्कृष्ट युक्तिवाद कौशल्य, सखोल अभ्यास व आत्मविश्वासाचे सर्वांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कैलाश पौळ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मूट कोर्ट स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये न्यायालयीन युक्तिवाद कौशल्य, संशोधन वृत्ती व आत्मविश्वास विकसित होतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच विधी सहाय्य केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजातील गरजू घटकांसाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यानंतर डॉ. स्वप्निल चौधरी यांनी आपल्या भाषणात मूट कोर्ट स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो व त्यांच्या युक्तिवाद कौशल्याचा विकास होतो, असे सांगितले.
सौ. रेवती देशपांडे (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजना व मोफत कायदेशीर सहाय्याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी कायदेविषयक जनजागृतीमध्ये सक्रिय भूमिका घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. नरेश वाघमारे (विधी विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) उपस्थित होते. त्यांनी कायद्याच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी समाजाच्या हितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा, असे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाने पहिल्याच वर्षी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्रीराम मधुसूदन मोडक यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना न्यायव्यवस्थेतील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. प्रभावी युक्तिवाद, सखोल अभ्यास, प्रामाणिकपणा व न्यायव्यवस्थेप्रती निष्ठा या गुणांच्या आधारेच सक्षम वकील घडतो, असे त्यांनी सांगितले. मूट कोर्ट संकल्पना, तिचा इतिहास व महत्त्व यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचा शंभर वर्षांचा गौरवशाली इतिहास व विद्यार्थ्यांना मिळणारे दर्जेदार कायदे शिक्षण ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव व संस्थापक अध्यक्ष श्री. संतोषजी खांडगे यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेचा इतिहास, महाविद्यालय स्थापनेची पार्श्वभूमी व उद्देश याबाबत माहिती दिली. महाविद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत त्यांनी सर्व मान्यवर व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सहाय्यक प्राध्यापक अनुप पाठक व सहाय्यक प्राध्यापक लेवी मॉर्निंगस्टार यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना धनंजय गुट्टे, सौ. रोहिणी देशपांडे व सागर गायकवाड यांचे सहकार्य लाभले. तसेच सर्व स्वयंसेवक व विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष श्री. नंदकुमार शेलार, खजिनदार श्री. राजेश म्हस्के, सह-सचिव श्री. विनायक अभ्यंकर तसेच संस्थेच्या इतर मान्यवर सदस्यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, कायदे शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा उपक्रम म्हणून त्याची विशेष दखल घेतली जात आहे.






