मावळ तालुक्यात अनधिकृत भंगार व्यवसायांचा सुळसुळाट: प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SHARE NOW

मावळ :

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, सोमाटणे, वडगाव, कामशेत आणि लोनावळा या प्रमुख शहरांमध्ये विनापरवाना व अनधिकृत भंगार व्यवसायांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, सुमारे ९० टक्के भंगार व्यवसाय हे कोणत्याही अधिकृत परवान्याविना सुरू असून, स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

पुणे-मुंबई महामार्गालगत तसेच दाट वस्त्यांमध्ये पत्राशेड उभारून हे व्यवसाय सर्रास सुरू आहेत. नियमबाह्य पद्धतीने चालणाऱ्या या व्यावसायिकांना पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवल्या जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी धोकादायक भंगार आणि कचऱ्याचे कोणत्याही सुरक्षाव्यवस्थेविना हाताळणी केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.

 

यातील बहुतांश व्यावसायिकांकडे आवश्यक परवाने नसल्याचे स्पष्ट झाले असून, अनेक दुकाने राजकीय पाठबळामुळेच सुरू असल्याच्या चर्चा रंगत आहेत. याशिवाय, काही भंगार व्यावसायिकांकडून पोलीस प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील मंडळींना नियमित चिरीमिरी दिली जात असल्याचेही तालुक्यात बोलले जात आहे. त्यामुळे कारवाईचा अभाव आणि अनधिकृत व्यवसायांचे बळकटीकरण यामागील कारणांबाबत संशय निर्माण झाला आहे.

Advertisement

 

दरम्यान, भंगार व्यवसायामुळे औद्योगिक वसाहतींमध्ये चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे चित्र आहे. भंगाराच्या नावाखाली चोरीचा माल खपवला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांचा सहभाग असल्याचेही निदर्शनास येत आहे.

 

भंगार गोळा करणाऱ्या वाहनांवर बेकायदेशीरपणे स्पीकर बसवून शहरात फिरत मोठ्या आवाजात घोषणा दिल्या जातात. व भंगार गोळा केले जात असून यामुळे ध्वनीप्रदूषणात मोठी भर पडत असून, वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीतही यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हे सर्व उघडपणे सुरू असताना प्रशासन डोळेझाक का करत आहे? असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

याचबरोबर, भंगारातील कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे वायू प्रदूषणातही वाढ होत आहे. अधूनमधून या गोदामांना आग लागण्याच्या घटनाही घडत असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. तरीही संबंधित यंत्रणांकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे.

 

या पार्श्वभूमीवर, मावळ तालुक्यातील अनधिकृत भंगार व्यवसायांवर तातडीने कारवाई करून नियमबद्धता आणण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page