इंद्रायणी महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या १३५ व्या पुण्यतिथीनिमित्त सत्यशोधक विचारांचा जागर

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

 

२८ नोव्हेंबर रोजी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने समाजसुधारक, स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते आणि शेतकरीहितचिंतक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३५ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य प्रा. एस. पी. भोसले, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. रूपकमल भोसले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश देवढे, नाट्य विभागप्रमुख प्रा. क्षीप्रसाधन भरड, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. मिलिंद खांदवे तसेच प्राध्यापक, कर्मचारीवर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.

यावेळी राज्यशास्त्र विभागातील प्रा. आर. आर. डोके यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय करून दिला. त्यांनी सामाजिक समता, जातिनिर्मूलन, अस्पृश्यताविरोधी कार्य, स्त्रीशिक्षणाचा प्रसार व शोषित-वंचित घटकांच्या उन्नतीसाठी फुले यांनी केलेल्या आयुष्यभराच्या संघर्षाचे महत्त्व स्पष्ट केले. पुण्यातील भिडेवाडा येथे इ.स. १८४८ मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून शिक्षणाचा हक्क सर्वांसाठी खुला करण्याचे ऐतिहासिक कार्य फुले दांपत्याने केले. शेतकरी, शेतमजूर व गरीब जनतेला योग्य न्याय मिळावा यासाठी त्यांनी शासनासमोर हमीभावाचा आग्रह धरला. समाजातील जातीय अन्याय व भेदभाव दूर करण्यासाठी ते अखेरपर्यंत झटले. त्यांच्या महान कार्याची दखल घेऊन समाजानेच त्यांना “महात्मा” ही उपाधी बहाल केली.

Advertisement

 

आपल्या मनोगतात उपप्राचार्य प्रा. एस. पी. भोसले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून फुले यांनी समता, बंधुत्व व मानवतेची बीजे रोवली असून आज समाजात झालेला सकारात्मक बदल त्यांच्या विचारांचा परिणाम असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी महात्मा फुले यांच्या साहित्यसंपदेचा परिचय देत छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे, ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथांचे समाजजागरणातील महत्त्व अधोरेखित केले. फुले आज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांचे विचार सदैव प्रकाशमान राहून भावी पिढीस मार्गदर्शक ठरणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. कृष्णा मिटकर यांनी केले. महात्मा फुले यांच्या पुरोगामी विचारांची ज्योत पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाल्याचा संदेश सर्वत्र उमटला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page