एनएमआयईटी मध्ये राष्ट्रीय पातळीवरील इनोवेटर हॅकेथॉनचे यशस्वी आयोजन
तळेगाव दाभाडे : शहरातील पीसीईटी आणि एनएमव्हीपीएम संचालित नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी टी हब यांच्या सहकार्याने येथे राष्ट्रीय पातळीवरील इनोवेटर हॅकेथॉनचे 2026 चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या हॅकाथॉनमध्ये देशभरातील तरुण तंत्रज्ञांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सर्जनशीलता, नवकल्पना आणि उद्योगाच्या गरजांशी सुसंगत वास्तववादी समस्यांवर उपाय सादर केले. यावेळी विजेत्या संघांना ९० हजार रुपयांची रोख पारितोषिके, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.
अभियांत्रिकी च्या कार्यकरी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के याच्या दूरदृष्टीतून ही संकल्पना साकार झाली असून महाविद्यालय हे एका अग्रगण्य स्थानावर नेण्याचे स्वप्न पाहणारे मावळभूषण स्व. कृष्णराव भेगडे यांच्या विचरांशी सुसंगत आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून असेंचर चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश कुलकर्णी यांनी बदलत्या औद्योगिक परिसंस्थेत नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित केले व विद्यार्थ्यांना वास्तव समस्यांवर परिणामकारक व स्केलेबल उपाय विकसित करण्याचे आवाहन केले. यावेळी नॉरमा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे कार्यकारी संचालक परशुराम घेवाडे यांनी यांत्रिकी अभियांत्रिकी, उत्पादन व ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवकल्पनांवर प्रकाश टाकला. टी- हब हैद्राबाद चे उपाध्यक्ष श्रीनिवास तलुका यांनी कल्पनेपासून उत्पादन व स्टार्टअपपर्यंतच्या प्रवासाबाबत सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. यावेळी एकत्रितपणे क्लाउड कम्प्युटिंग, कौशल्याधारित शिक्षण, विज्ञान व अभियांत्रिकीतील फरक, आजीवन शिक्षण तसेच वेगाने बदलणाऱ्या स्टार्टअप व उद्योजकतेच्या परिसंस्थेवर मार्गदर्शन केले.
यावेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या दूरदृष्टीचे प्रतिक असलेल्या अत्याधुनिक केंद्रीय ग्रंथालयाचे आणि इंटेल एआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन एआयसीटी नवी दिल्ली चे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, एटॉस चे उपाध्यक्ष माधव कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
समारोप व पारितोषिक वितरण समारंभास मुख्य अतिथी डॉ. अभय जेरे, माधव कुलकर्णी आणि डॉ. राज विष्णू उपस्थित होते. समारोप पर भाषणात डॉ. जेरे यांनी आजीवन शिक्षण, डिझाइन थिंकिंग व नवोन्मेषाभिमुख शिक्षणावर भर देत स्मार्त इंडिया हॅकेथॉनचे सारख्या उपक्रमांचे राष्ट्रीय नवोन्मेष संस्कृती घडवण्यात असलेले योगदान अधोरेखित केले.
अभियांत्रिकी चे संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेत संस्थेच्या वाटचालीची आणि उपक्रमांची माहिती दिली. प्रा. डॉ. रोहिणी हंचाटे, मुजाईद शेख, प्रा. प्रीतम आहेर यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष,माजी राज्य मंत्री संजय भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे, सहसचिव विनायक अभ्यंकर, खजिनदार तसेच अभियांत्रिकी च्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, राजेश म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते






