एक गाव, एक शिवजयंतीचा मंगल निनाद .तळेगाव दाभाडे नगरीत ६ मार्च रोजी भव्य शोभायात्रा

SHARE NOW

तळेगाव दाभाडे : स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगरीत यंदा एक गाव, एक शिवजयंती हा मंगल संकल्प साकार होत आहे. ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या पुढाकाराने फाल्गुन वद्य तृतीया, शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ रोजी हा भव्य सोहळा दिमाखात पार पडणार असून अवघी तळेगाव नगरी शिवमय होणार आहे.

 

श्री डोळसनाथ महाराजांच्या पवित्र मंदिर प्रांगणातून सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शोभायात्रेचा शुभारंभ होईल. ढोल-ताशांचा गजर, रणशिंगांचा निनाद आणि जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणांनी अवघे तळेगाव दाभाडे दुमदुमून जाईल. भगव्या पताकांनी सजलेले रस्ते, पारंपरिक वेषभूषेतील शिवभक्त आणि मावळ्यांच्या दिमाखदार वेशात सजलेले युवक यामुळे शिवकालीन वातावरणाची अनुभूती लाभेल. शोभायात्रेचा समारोप श्री शिवशंभू तीर्थ येथे होणार असून तेथे दीपप्रज्वलन व अभिवादनाचा कार्यक्रम होईल.

 

यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे श्री शिवशंभू तीर्थ ही अद्वितीय संकल्पना. शिवकालीन वैभवाचे दर्शन घडविणारी दक्षिण दिग्विजय रथाची भव्य प्रतिकृती यावेळी उभारण्यात येणार आहे. या रथातून स्वराज्य विस्ताराची गाथा, पराक्रमाची स्मृती आणि धर्मरक्षणाची शिकवण जिवंत केली जाणार आहे. तसेच श्रीशैलम ज्योतिर्लिंग स्थळाची देखणी मांडणी करण्यात येणार असून श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम अनुभवता येईल.

Advertisement

 

मावळी ढोल-ताशा पथकाच्या दमदार तालावर शोभायात्रा मार्गक्रमण करणार आहे. पारंपरिक लेझीम, भव्य भगवे ध्वज, शिवकालीन शस्त्रांची प्रतिकृती आणि ऐतिहासिक देखावे यामुळे नागरिकांना स्वराज्यकालीन क्षणांचा प्रत्यय येईल. अत्याधुनिक ध्वनीव्यवस्था आणि आकर्षक रोषणाईमुळे सोहळ्याला वैभवाची किनार लाभणार आहे. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम या उत्सवात पाहावयास मिळेल.

 

एक गाव, एक शिवजयंती या संकल्पनेतून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचा समितीचा प्रयत्न आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व ग्रामस्थ एकत्र येत छत्रपतींच्या विचारांचा जागर करतील. युवकांनी शिस्त, संघटन आणि राष्ट्रनिष्ठा या गुणांचे पालन करावे, हा संदेश या सोहळ्यातून देण्यात येणार आहे.

 

तळेगाव दाभाडे येथील समस्त नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून शिवजयंती उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे. स्वराज्याचा दीप तेवत ठेवण्याची आणि शिवचरित्राची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची ही संधी असल्याचे समितीचे मत आहे. अवघी नगरी शिवमय होऊन ६ मार्च रोजी शिवभक्तीचा महासागर उसळणार, यात शंका नाही.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page