सीएसआरच्या माध्यमातून १०८ वर्षांच्या शाळेला नवे ‘ज्ञानमंदिर’
तळेगाव दाभाडे :

राज्याच्या विविध भागांत मराठी शाळा बंद पडत असतानाच तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या १०८ वर्षे जुन्या शाळेच्या प्रांगणात बुधवारी (दि. १८) आनंद आणि उत्साहाचा जल्लोष पाहायला मिळाला. Larsen & Toubro (एल अँड टी) कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत उभारलेल्या अत्याधुनिक ज्ञानमंदिर इमारतीचे लोकार्पण तसेच संगणक कक्ष आणि तंत्रविज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन या वेळी करण्यात आले.
कार्यक्रमास मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड, मावळ तालुका शिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी अनिता वैद्य, एल अँड टीचे सरव्यवस्थापक राजेश दळवी आणि सहसरव्यवस्थापक के. पवन उपस्थित होते. संगणक कक्ष व तंत्रविज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी रोडगे आणि मुख्याधिकारी दापकेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर एल अँड टी प्रायोजित लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण दापकेकर आणि दळवी यांनी केले.
विद्यार्थी व शिक्षकांनी मान्यवरांचे पारंपरिक औक्षण करून स्वागत केले. कार्यक्रमात बोलताना मुख्याधिकारी दापकेकर यांनी ‘वाढ’ आणि ‘विकास’ यांतील फरक अधोरेखित करत शैक्षणिक क्षेत्रात दोन्ही आघाड्यांवर नगर परिषद काम करत असल्याचे सांगितले. शिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे यांनी शिक्षणातील लोकसहभागाचे महत्त्व स्पष्ट केले.
प्रशासन अधिकारी अनिता वैद्य यांनी शिक्षणासाठी किमान सहा टक्के खर्च अपेक्षित असताना प्रत्यक्षात तो ०.३ ते ०.५ टक्क्यांदरम्यान मर्यादित राहत असल्याची खंत व्यक्त केली. निधीअभावी सीएसआर संकल्पना महत्त्वाची ठरत असून शिक्षण क्षेत्रात लोकसहभाग निर्णायक भूमिका बजावू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
मुख्याध्यापिका संध्या कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात एल अँड टी कंपनीचे आभार मानत अत्यंत दर्जेदार व सर्वसुविधायुक्त इमारत शाळेला उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास अतुल खेडेकर, प्रा. ए. ए. खान, भालचंद्र नाटेकर, गोपाळ शिंदे, यशवंत गवस, सचिन कारंडे, अतुल देशपांडे, लेखाधिकारी बाळासाहेब जढर, मयुरेश मुळे, महादेव कोकरे, राहुल भंडारे, जगन्नाथ कांबळे यांच्यासह नगर परिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिता शिंदे व कविता खराडे यांनी केले; आभार रुपेश काटकर यांनी मानले.






