मावळच्या प्रलंबित प्रकल्पांना गती द्या; बाळाभाऊ भेगडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाम मागणी
मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी मुंबई येथे भेट घेत मावळ तालुक्यातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत मावळच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणारे दोन मोठे मेट्रो प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
🔹 निगडी ते लोणावळा मेट्रो मार्ग –
पुणे महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि पर्यटनाच्या गरजा लक्षात घेता हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळून वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
🔹 हिंजवडी ते नवलाख उंब्रे MIDC मेट्रो प्रकल्प –
हिंजवडी आयटी पार्क ते नवलाख उंब्रे MIDC हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा पट्टा असून या मार्गामुळे कामगार, कर्मचारी व उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उद्योगवाढीस चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.
या दोन्ही प्रकल्पांमुळे मावळ तालुक्याच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून भविष्यातील विकासासाठी हे प्रकल्प निर्णायक ठरणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने लक्ष देत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले.
मावळच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






