*विद्यार्थ्यांनी आधी माणूस बनावे- संजय आवटे*
तळेगाव दाभाडे –

विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत मोठी स्वप्ने पहावीत, स्वप्नांचा आशय मोठा असावा आणि यश प्राप्त करावे मात्र हे करीत असताना अगोदर माणूस बनावे असा सल्ला ज्येष्ठ संपादक व विचारवंत संजय आवटे यांनी विद्यार्थ्यांना दिला. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉमर्स फेस्टिवलच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्य व चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. रूपकमल भोसले, डॉ. सुरेश देवडे तसेच महाविद्यालयातील विविध प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आवटे म्हणाले की, आपल्या संस्कृतीत स्त्रीला स्त्री म्हणून वाढविले जाते आणि पुरुषाला पुरुष म्हणून वाढवले जाते परंतु या दोघांनाही माणूस म्हणून वाढवण्यात समाज कमी पडतो. विद्यार्थ्यांनी जाती भेदाच्या पलीकडे जाऊन माणूस धर्माचा अंगीकार करावा व समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी प्रयत्न करावे असे संजय आरोटे म्हणाले. याप्रसंगी आवटे यांनी महापुरुषांच्या जीवन चरित्राचा आणि त्यांच्या संघर्षाचा परामर्ष विद्यार्थ्यांना करवून दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे म्हणाले की, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेची वाटचाल ही संघर्षमय राहिलेली आहे. जनरल हॉस्पिटलमध्ये ४४ विद्यार्थ्यांवर इंद्रायणी महाविद्यालयाची सुरुवात झाली. आज १५ एकरचा भव्य महाविद्यालयीन परिसर विविध अभ्यासक्रमांच्या इमारतीने नटलेला आहे, आठ एकरावरील खेळाचे भव्य क्रीडांगण विकसित झालेले आहे. या सर्वांच्या मागे अनेकांचे परिश्रम असून विद्यमान अध्यक्ष रामदास काकडे यांच्या भक्कम पाठीमागे संस्था प्रगती कडे जात असल्याचे गौरवोद्गार चंद्रकांत शेटे यांनी काढले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. मलघे म्हणाले की, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी आणि विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी इंद्रायणी महाविद्यालय कडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कसून प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून कॉमर्स फेस्टिवल हा यशस्वी ठरला. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमातून प्रोत्साहन पर कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करून आपले करिअर घडवावे असा सल्ला डॉ.मलघे यांनी दिला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वाणिज्य विभागाच्या प्रमुख प्रा. रूपकमल भोसले यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी वाणिज्य विभागाच्या उज्वल यशस्वी परंपरेचा आढावा उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना करून दिला. कॉमर्स फेस्टिवलच्या आयोजनामाची भूमिका आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न याबद्दल प्रा.भोसले यांनी माहिती सांगितली.
याप्रसंगी कॉमर्स फेस्टिवलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्वेता खांदवे यांनी केले तर आभार डॉ. कृष्णा मिटकर यांनी मानले.






