विद्यार्थ्यांची मतदार जागृती रॅली तळेगावात उत्स्फूर्त
तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागाच्या निर्देशांनुसार मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या स्वीप उपक्रमाच्या अंतर्गत स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. नगरपरिषद शिक्षण मंडळातील सात शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व उपक्रमांत सहभागी होत लोकशाहीतील मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व अधोरेखित केले. गाव आणि स्टेशन परिसरात काढण्यात आलेल्या रॅलींमधून विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचा संदेश दिला.
नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक २ मध्ये वक्तृत्व, निबंध, चित्रकला व पोस्टर मेकिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका वर्षा थोरात यांनी दिली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसरात “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो”, “वृद्ध असो वा जवान, सर्वजण करा मतदान”, “वाढवू तिरंग्याची शान, करू या देशासाठी मतदान”, “सोडा सर्व काम, चला करूया मतदान” अशा जोशपूर्ण घोषणा देत वातावरण दुमदुमवले. या रॅलीचे संयोजन प्रमुखाध्यापिका वर्षा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका योगिता तावरे, मीना सावंत, नीलम जाधव, निकिता कालेकर व सुप्रिया वावळ यांनी केले.
दरम्यान, वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक ५ येथेही मतदान जनजागृती अभियान विविध उपक्रमांसह संपन्न झाले. वक्तृत्व, निबंध, चित्रकला व वादविवाद स्पर्धा, मतदार जनजागृती रॅली तसेच शपथ विधी अशा उपक्रमांचा समावेश करण्यात आला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर आणि शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी अनिता वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात आल्याचे मुख्याध्यापिका विजया दांगट यांनी सांगितले. विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
शाळा क्रमांक १ ते ७ मधील राष्ट्रीय बालदिन सोहळ्याचे संयोजन मुख्याध्यापक वैशाली मिरघे, सुजाता कुलकर्णी, अनिता तिकोने, विजया दांगट, संजय चांदे, वसुंधरा माळवदकर आणि केशव चिमटे यांनी केले.






