तळेगाव दाभाडे नगपरिषद निवडणूक : मतदान कर्मचाऱ्यांचे ‘द्वितीय प्रशिक्षण’ उत्साहात
तळेगाव दाभाडे:

तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची तयारी वेगात सुरू असून मतदान प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी नगरपरिषदेतर्फे मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण सोमवारी (दि. २४ नोव्हेंबर २०२५) उत्साहात पार पडले. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत आयोजित या प्रशिक्षणाला एकूण ४२५ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही सत्रांमध्ये प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले. मतदान केंद्रांवरील कामकाजाची अचूक समज, नियमावली, आचारसंहिता आणि तांत्रिक बाबी यांवर सविस्तर मार्गदर्शन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश दापकेकर आणि उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी केले. मतदान प्रक्रियेत प्रत्येक अधिकाऱ्याने दक्ष राहून जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रशिक्षणादरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान यंत्रांची हाताळणी करून पाहण्याची संधी मिळाली. ईव्हीएम (EVM) व VVPAT यांच्या कार्यप्रणालीचे प्रात्यक्षिक नायब तहसीलदार अविनाश पिसाळ यांनी दिले. मतदान यंत्रांची सेटिंग, मॉक पोल प्रक्रिया, सीलिंग, शेवटची तपासणी या सर्व टप्प्यांचे प्रत्यक्ष शिकवणीसह स्पष्टीकरण देण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करून मतदानाच्या दिवशी कोणतीही गफलत होऊ नये याची काटेकोर तयारी करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेतील अचूकता, पारदर्शकता आणि सुयोग्य नियोजनाच्या दृष्टीने दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगामी निवडणुकांसाठी तयार केलेल्या प्रत्येक मतदान केंद्राने शिस्तबद्ध पद्धतीने काम करावे आणि मतदारांना सुलभ वातावरण मिळावे, यासाठी या प्रशिक्षणाचा मोठा उपयोग होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






