तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज पालखी छबिना मिरवणूक सोहळा उत्साहात
तळेगाव दाभाडे:विजयादशमीनिमित्त तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या छबिना पालखीची मिरवणूक गुरुवारी (ता. २) सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहात पार पडली. ग्राम प्रदक्षिणेदरम्यान नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
दरवर्षीप्रमाणे विजयादशमीनिमित्त ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज आणि जोगेश्वरी मातेच्या पालखीत विराजमान मुखवट्यांची आरती विश्वस्त राजेश पिराजी सरोदे व उत्सव समिती अध्यक्ष अविष्कार अंशोक(अंकल) भेगडे यांच्या हस्ते करण्यात आली.
आरतीनंतर छबिना-पालखी सीमोल्लंघनासाठी मंदिरातून नगारा, संभाळ, शिंगाड, शंख, डमरू, टाळ-मृदुंग आणि ज्ञानोबा-तुकाराम यांच्या गजरात भजनी मंडळे, महिला भगिनी, पालखीचे मानकरी, भोई समाज बांधव, भराडी, गोंधळी, डोळसनाथ महाराज ट्रस्ट, उत्सव समिती, तालीम मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सीमोल्लंघनानंतर पालखी ग्राम प्रदक्षिणा करून पुन्हा मंदिरात आली. आरतीनंतर शारदीय नवरात्र उत्सव आणि छबिना पालखी सोहळ्याची सांगता झाली.
पालखी मार्गावर (तळ्याकाठी) कै. शंकर कुंभार परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. पालखीसोबत नगारा, घोडे, विद्युत रोषणाई असलेल्या छत्र्या, ऐतिहासिक वेशात तलवार घेऊन वीर, दानपट्टाधारक गोंधळी व भराडी उपस्थित होते. ठिकठिकाणी गावकऱ्यांनी औक्षण करून व रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले.
श्री डोळसनाथ महाराज मंदिरात दसऱ्यापूर्वी आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नवरात्रीनिमित्त नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये सप्तशती पाठ, भोंडला, कुमारिका पूजन, हळदी- कुंकू, देवीचा जोगवा, स्त्रीसुंक्त, स्तोत्र पठण, दीप प्रज्वलन, कालभैरवाष्टक आरती व नवचंडी याग यांचा समावेश होता.






