जागतिक वन्यजीव दिनी दोन नागांना जीवदान वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची तत्पर कारवाई
आढले (मावळ), दि. ३ मार्च : जागतिक वन्यजीव दिनानिमित्त वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या वतीने आढले गावात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आढळलेल्या दोन नागांना सुरक्षित पकडून जंगलात सोडण्यात आले. संस्थेच्या या तत्पर आणि धाडसी कार्यामुळे दोन वन्यजीवांना जीवदान मिळाले असून नागरिकांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे.
संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना आढले गावातील गौरव कचरू घोटकुले यांच्या घरात नाग शिरल्याची माहिती दूरध्वनीवरून मिळाली. माहिती मिळताच गराडे यांनी तात्काळ संस्थेच्या ग्रुपवर संदेश पाठवून मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत संस्थेचे सदस्य विराज गराडे त्वरित घटनास्थळी जाण्यास सज्ज झाले.
सोमाटणे फाट्यावरून अल्पावधीतच विराज गराडे आढले येथे दाखल झाले. घरात प्रत्यक्ष पाहणी केली असता मोठा नाग घरात वावरत असल्याचे आढळले. घरातील सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. विराज गराडे यांनी प्रथम नागरिकांना सर्पांविषयी प्राथमिक माहिती देत घाबरून न जाण्याचे आवाहन केले. सर्प हा पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असून तो उगाच हल्ला करत नाही, असे समजावून सांगितले. त्यानंतर अत्यंत कौशल्याने नागाला सुरक्षितरित्या पकडण्यात आले. पकडलेल्या नागाला नैसर्गिक अधिवासात, सुरक्षित जंगल परिसरात सोडून देण्यात आले.
ही कारवाई पूर्ण करून विराज गराडे घरी परतले असतानाच संस्थेचे सदस्य रवी कोळी यांना गावातील गोशाळेत नाग दिसल्याचा दुसरा फोन आला. सुरुवातीला पहिल्याच घटनेबाबत पुन्हा कॉल आला असावा, अशी शंका व्यक्त झाली. मात्र पुन्हा खात्री करून घेतल्यावर गोशाळेत प्रत्यक्ष नाग समोर असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विराज गराडे पुन्हा तातडीने आढले गावात दाखल झाले. गोशाळेत जाऊन पाहणी केली असता दुसरा नाग आढळून आला. कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी त्यांनी काळजीपूर्वक नाग पकडला. स्थानिकांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. त्यानंतर दुसऱ्या नागालाही सुरक्षित जंगलात सोडण्यात आले.
जागतिक वन्यजीव दिनीच दोन नागांचे यशस्वी रेस्क्यू झाल्याने पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक ठळकपणे अधोरेखित झाला आहे. सर्पांसारखे वन्यजीव पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. भीतीपोटी त्यांना मारण्याऐवजी तज्ज्ञांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवणे गरजेचे आहे, असे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
घरात किंवा परिसरात वन्यप्राणी जखमी अवस्थेत अथवा साप आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता वन विभागाच्या १९२६ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थापक निलेश गराडे व अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.






