“रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी कडून महिला शक्तीचा सन्मान; स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महिला दिन उत्साहात”
तळेगाव दाभाडे : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.च्या वतीने गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, शांताईनगरी, तळेगाव दाभाडे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिला स्त्रीशक्तीचा गौरव करत स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमधील महिला शिक्षक तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.च्या महिला सदस्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.च्या सदस्या तसेच स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रेणू शर्मा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.चे विद्यमान अध्यक्ष रो. प्रवीण भोसले यांनी केले.
यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रो. शंकर हादिमनी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.चे संस्थापक अध्यक्ष संतोषजी खांडगे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. महिलांना समान हक्क, अधिकार आणि सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करणे हीच खरी कृतज्ञता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन गुंजाळ मॅडम यांनी त्यांच्या मधुर वाणीमध्ये केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी एकत्र छायाचित्रण करून आनंदाचा क्षण टिपला.






