प्रशासक कालावधीत झालेल्या विकासकामांचा हिशेब द्या! – नगरसेवक दीपक भेगडे यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
तळेगाव दाभाडे : नगरपरिषदेमध्ये प्रशासक कालावधीत झालेल्या विकासकामांबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी नगरसेवक दीपक भेगडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात प्रशासक कार्यकाळात मंजूर व पूर्ण झालेल्या विकासकामांची यादी, अपूर्ण कामांची स्थिती, खर्चाचा तपशील, तसेच टेंडर प्रक्रियेची माहिती देण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. याशिवाय विविध योजनांवर झालेला खर्च, मिळालेला निधी, तसेच नगरपरिषदेच्या मालमत्ता व देणी (Assets & Liabilities) यांचाही तपशील जाहीर करावा, असेही नमूद करण्यात आले आहे.
नगरसेवक भेगडे यांनी प्रशासनाच्या पारदर्शकतेवर भर देत नागरिकांना सर्व माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच या माहितीद्वारे भविष्यातील विकास आराखडा अधिक सक्षमपणे तयार करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निवेदनामुळे नगरपरिषद प्रशासनासमोर पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






