नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे येथे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन
तळेगाव दाभाडे : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे येथे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. “सामर्थ्य, समानता आणि उत्कृष्टतेचा उत्सव” या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत स्त्रीशक्तीचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व विधी महाविद्यालयाचे संस्थापक श्री. संतोषजी खांडगे यांनी आपला संदेश देताना सांगितले की, कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्थापन झालेल्या या विधी महाविद्यालयात त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा करून स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याची परंपरा जपली जाईल. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व शिक्षणाच्या प्रसारासाठी संस्था विविध उपक्रम राबविण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. कैलाश पौळ यांनी “संविधान आणि स्त्रियांचे हक्क” या विषयावर मार्गदर्शन करताना भारतीय संविधानाने महिलांना दिलेले मूलभूत अधिकार, समानतेची हमी आणि न्यायव्यवस्थेत महिलांची वाढती भूमिका यावर प्रकाश टाकला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण, कायदेशीर जागरूकता आणि सामाजिक सहभाग यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमात प्रा. अनुप पाठक आणि प्रा. लेवी मॉर्निंगस्टार यांनी महिला सक्षमीकरण व सामाजिक समतेविषयी आपले विचार मांडले. कार्यक्रमानिमित्त विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये अनुश्का परांदवळ, आकांक्षा शिंदे, विद्या शिंदे, रेनुका हंडीगोल आणि श्रेया बनसोडे यांनी विजेतेपद पटकावले. विजेत्यांना पदके व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रोहिणी देशपांडे, धनंजय गुट्टे आणि सागर गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे योगदान दिले.






