“शॉर्टकट न शोधता भरपूर मेहनत करा” – दिलीप प्रभावळकर कलापिनीच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुलाखतीत मांडले विचार

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

“’तुम्हाला जे करावसं वाटतं त्याचा पाठपुरावा करुन, कोणत्याही गोष्टीत शॉर्टकट न शोधता भरपूर मेहनत करा. कोणतंही काम भावना आणि बुद्धि या दोन्ही स्तरावर विचार करून करणं गरजेचं आहे.” असे मौलिक विचार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले. कलापिनीच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी दिलीप प्रभावळकर, सुबोध खानोलकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, वृषालीराजे दाभाडे सरदार, दिव्यलेखाराजे दाभाडे सरदार, संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, श्रीशैल गद्रे, डॉ अनंत परांजपे, अंजली सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रभावळकर पुढे म्हणाले, “ दिग्दर्शक हा कॅप्टन असुन मी कधीही त्याच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाही. नट म्हणून केलेल्या व्यक्तिरेखेचा माणूस म्हणुन तुमच्यावर परिणाम होतो असं मला वाटतं.” दशावतार, लगे रहो मुन्नाभाई, चिमणराव, चौकटराजा या सगळ्यांमधल्या भूमिका कशा कशा होत गेल्या? अनुभव, अडचणी याचे संपूर्ण चलचित्रच प्रेक्षकांच्या नजरेसमोर प्रभावळकर यांनी केले. प्रत्येक अनुभवाला विनोदी झालर असलेने हा प्रवास संपूच नये असे वाटत होते. आपल्या अभिनयाने नाटक, सिनेमा आणि मालिका गाजवणारे प्रभावळकर, कलापिनीच्या प्रांगणात प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या रसिक प्रेक्षकांसमोर बोलत होते. ही मुलाखत नवोदित आणि अनुभवी दोन्ही कलाकारांसाठी बहुमुल्य असे मार्गदर्शन करणारी ठरली.

कार्यक्रमाची सुरवात वादिराज लिमये यांनी लिहिलेल्या, विनायक लिमये यांनी संगीतबध्द केलेल्या गीताने आणि ‘दशावतार ‘या चित्रपटातील ‘गोड मानुनी घे रंगपूजा’ या किर्ती पेडणेकर आणि सहकारी यांनी सादर केलेल्या नृत्याने झाली.

Advertisement

यावेळी कलापिनीच्या गौरव पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार पुढीलप्रमाणे – बालभवन सितारा – समर्थ खोंड, जोवी चोरमुले, कुमार भवन सितारा – वैदेही देशमुख, विवान रुपनवर, लक्षवेधी बालकलाकार – रेणू सहस्रबुद्धे, स्वास्थ्य योग गौरव पुरस्कार – वंदना सोनावणे, अशोक सोनाळकर, धडपड पुरस्कार – राखी भालेराव, कै. पुष्पलता अरोरा स्मृती प्रशिक्षिका पुरस्कार – ऋचा पोंक्षे, महिला मंच सखी पुरस्कार – रूपाली पाटणकर, कै.गोदावरी भाभी व कै. विष्णू भाई शहा स्मृती सेवाभावी कार्यकर्ता पुरस्कार – अशोक बकरे आणि सुनीता बकरे. रंगकर्मी पुरस्कार – अनघा बुरसे, सुबोध भावे पुरस्कृत कै. सतीश तारे स्मृती कलाकार पुरस्कार – संदीप मनवरे, सुबोध भावे पुरस्कृत कै. विजय तेंडुलकर स्मृती लेखन पुरस्कार अंजली कराडकर, कै. हेमंत तुंगार युवा गौरव पुरस्कार – चैतन्य जोशी.

निर्माता, दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी आपल्या मनोगतातातून दशावतारचे सगळ्यात आधी कालापिनीने कौतुक केले असे सांगून हे माझ्या घरचं कौतुक होते हे आवर्जून सांगितले”. नगराध्यक्ष संतोष दाभाडे म्हणाले, “एवढी मोठ्ठी संस्था वाढवायची, टिकवायची हे सोपं नाही. मात्र इथले कार्यकर्ते, प्रेक्षक यांच्या सहभागामुळे संस्था भरीव असे काम करते आहे” कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी कलापिनीतील वेगवेगळ्या सादरीकरणासाठी उपलब्ध रंगमंचाची माहिती दिली. संस्थेचे विश्वस्त डॉ अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना सांगितले, “वर्धापनदिन म्हणजे बुस्टर डोस असुन कलापिनी हे मावळातील कलाकारांचे बंदर आहे.” सत्यशीलराजे दाभाडे सरदार यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रवेश कक्षात आतापर्यंतच्या कलापिनीतल्या कलेच्या आणि उपक्रमांचा आढावा फोटो प्रदर्शनाच्या माध्यमातून साकारला होता.

माधुरी ढमाले – कुलकर्णी आणि लीना परगी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विनया केसकर आणि विराज सवाई यांनी प्रकट मुलाखत घेतली. अंजली सहस्रबुद्धे यांनी वर्षभर झालेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. हेमंत झेंडे यांनी आभार मानले.

कलापिनीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page