तरुणांनो नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार करून रोजगार निर्मिती करा : खासदार श्रीरंग बारणे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेत आयोजित नोकरी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

SHARE NOW

तळेगाव दाभाडे, दि. २८ :

 

यशवंतराव चव्हाण यांनी दूरदृष्टी ठेवत पुण्याच्या परिसरात कंपन्या आणल्या. त्याचे कंपन्यांचे जाळे विस्तारत नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार करून रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यायला हवा. बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू, असे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले.

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, इंद्रायणी महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या प्रांगणात आयोजित नोकरी महोत्सवाचे उदघाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, इंद्रायणी विद्यमंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, ऍड. रवींद्रनाथ दाभाडे, डीएमसीएफएस’चे कार्यकारी संचालक डॉ. संजय झोपे, उद्योजक संजय साने, युवा उद्योजक रणजीत काकडे, उद्योजक विशाल लोखंडे, उद्योजक महेश निंबाळकर, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य साहेबराव पाटील, कंपन्यांचे एचआर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, की उद्योजक रामदास काकडे यांचा मावळमध्ये कंपन्यांना पोषक वातावरण निर्माण करण्यात मोठा वाटा आहे. पुणे हे नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने सगळ्यात सुरक्षित शहर आहे. देशाच्या कानकोपऱ्यातून नोकरीच्या शोधात तरुण इथे येतात. या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना नोकरी देण्याचे, व्यवसाय मार्गदर्शनाचे काम होत आहे. यामुळे कंपन्यांना चांगले उमेदवार मिळण्यास मदत होईल. चांगले काम करा, चांगली मानसिकता ठेवा, असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले. ते पुढे बोलताना म्हणाले, की रेल्वेच्या विस्तारीकरणामुळे कनेक्टिव्हिटी वाढली आहे. त्यामुळे नोकरी व व्यवसायाच्या कक्षा रुंदवणार आहेत.

राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, की या माध्यमातून तरुणांना करिअरची दिशा मिळण्यास मदत होते. मावळ तालुका इंडस्ट्रिअल हब झालेला असून, वेगाने विकास होत आहे. कोरियन, जापनीज, जर्मनी, तसेच इतर बहुउद्देशीय कंपन्या इथे आल्या आहेत. आपल्याला नोकरी की व्यवसाय करायचा आहे, हे निश्चित करा. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना भाषा संवादक म्हणून गरज भासत आहे. त्यामुळे इथे अनेक भाषा शिकवल्या जात आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे.

Advertisement

रामदास काकडे म्हणाले, की चांगल्या उमेदवारांची कंपन्या वाट पाहत असतात. त्यामुळे कंपन्यांची गरज ओळखून शिक्षकांनी कौशल्याधारित विद्यार्थी घडवावेत. कंपन्यांच्या काय गरजा आहेत, हे ओळखून अभ्यासक्रम तयार करायला हवेत. विविध महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांशी कंपन्यानी संवाद साधल्यास आवश्यक कौशल्य असलेले उमेदवार मिळतील. कंपन्यामधील वातावरण कसे असावे, याचा एचआर’ने अभ्यास करावा. कंपन्यांनी सीएसआर फंड शाळा, महाविद्यालयाना द्यावा. जुन्या मशिन्स दिल्या तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मोठा फायदा होईल. नव्याने येऊ पाहत असलेल्या कंपन्यांना जागा उपलब्ध झाल्यास रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील. या क्षेत्रातील समस्या सोडविण्याचे आवाहन रामदास काकडे यांनी खासदार बारणे यांना केले.

चंद्रकांत शेटे म्हणाले, गतवर्षीपेक्षा यंदा गरजू उमेदवारांची जास्त नोंदणी झाली आहे. कंपन्या आणि महाविद्यालय यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. यातूनच अनेकांना रोजगार देण्याचे काम केले जात आहे.

संजय झोपे म्हणाले, की सर्व वेगवेगळ्या भागातून आलेलो असलो, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असली तरी आपण उत्कृष्ट करिअर करू शकतो. तुमचा दृष्टिकोन बदला, प्रगती नक्की होईल. स्वयंरोजगाराला मोठी संधी आहे.

प्राचार्य साहेबराव पाटील यांनी यशोदा महादेव काकडे इंजिनिअरिंग कॉलेज राबवित असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती दिली. तसेच रोजगाराभिमुख कौशल्य देण्यावर भर असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विविध कंपन्यांच्या एचआर यांचा खासदार बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी एचआर यांनीही विचार व्यक्त केले. त्यांनी मार्केटमध्ये काय पाहिजे, याचा अभ्यास करा. कंपन्यांना कौशल्याधारित मनुष्यबळ मिळणे महत्वाचे असते, हे सांगितले.

प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी, सूत्रसंचालन प्रियांका रोकडे व राजाराम डोके यांनी, तर आभार विशाल लोखंडे व महेश निंबाळकर यांनी मानले.

 

 

चौकट :

९२० उमेदवारांची नोंदणी, ८०६ जणांना नोकरीचे ऑफर लेटर :

पाचवी ते दहावी, बारावी, डिप्लोमा, आयटीआय, इंजीनियरिंग, बी.एस.सी., एम.एस.सी., बी.ए., बी.कॉम, बी.बी.ए., बी.सी.ए. उत्तीर्ण असलेल्या ९२० उमेदवारांनी नोंदणी केली. यापैकी ८०६ जणांना नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आले. यामध्ये ८ दिव्यांगांना नोकरी देण्यात आली. तळेगाव, चाकण, कान्हे, उर्से, टाकवे औद्योगिक क्षेत्रातील ४८ कंपन्यांमध्ये बेरोजगारांनी या नोकरी महोत्सवाचा लाभ घेतला


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page