लोणावळा उपजिल्हा रुग्णालय भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी; तरुणांचे प्रशासनाला निवेदन
लोणावळा: लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या आगामी भरती प्रक्रियेत स्थानिक सुशिक्षित तरुणांना प्राधान्य देण्यात यावे, या मागणीसाठी शहरातील तरुणांनी एकत्र येत प्रशासन आणि नगरपरिषदेला कळकळीचे विनंती निवेदन दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांच्या भरतीबाबत हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, लोणावळ्यातील रोजगाराच्या संधी प्रथम स्थानिक उमेदवारांना मिळाव्यात, अशी भूमिका तरुणांनी मांडली आहे. स्थानिकांना प्राधान्य मिळाल्यास रुग्णालयाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येईल आणि परिसरातील बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळेल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी सुमेग सोनावणे, ॲड. प्रफुल सोनवणे, सनी पाळेकर, प्रशांत जाधव, सुमित गायकवाड, जयेश देसाई, पुष्पक चौहान, प्रवीण देशमुख, राज बुगडे यांसह शहरातील स्थानिक तरुण उपस्थित होते. प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी विनंती या शिष्टमंडळाने केली आहे. या निवेदनामुळे आता प्रशासन भरती प्रक्रियेत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






