32 तासांच्या संकटात वर्दीतील माणुसकी! लोणावळा पोलिसांचा भाजप पंचायत राज विभागाकडून सत्कार
लोणावळा :

3 फेब्रुवारी रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलीन वायूचा टँकर उलटल्याने मोठा अपघात झाला. टँकरमधून वायू गळती सुरू झाल्याने एक्सप्रेसवेवरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आणि तब्बल 32 तास प्रवाशांचा खोळंबा झाला. या घटनेनंतर सरकार व प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली असली तरी, या अत्यंत भयावह परिस्थितीत लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, NDRF, SDRF तसेच अग्निशामक दल यांनी जीव धोक्यात घालून अथक प्रयत्न करत पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

या सर्वांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंचायत राज व ग्रामविकास विभाग भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी वर्गाचा प्रातिनिधिक सत्कार आयोजित करण्यात आला. हा सत्कार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री. सचिन टकले यांच्या नेतृत्वाखाली आणि खडकवासला विधानसभेचे पंचायत राज व ग्राम विकास विभाग अध्यक्ष प्रशांतजी पाटील यांच्या वतीने पार पडला.
या कार्यक्रमास पुणे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम कडू, लोणावळा नगरपरिषदेचे नगरसेवक दत्तात्रय येवले, लोणावळा भाजप युवा मोर्चाचे शुभम जाधव, खडकवासला युवा मोर्चाचे उपाध्यक्ष स्वप्निल पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश रामघारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक शेखर कुलकर्णी तसेच महिला व पुरुष पोलीस हवालदारांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगरसेवक सचिन टकले यांनी सांगितले की, “या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून उत्कृष्ट कामगिरी बजावली. तसेच वाहतूक पोलिसांनी अखंड 32 तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना पाणी, बिस्कीट पुडे तसेच लहान मुलांसाठी खाद्यपदार्थ वाटप करून वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविले.”
यावेळी पोलीस निरीक्षक राजेश रामघारे यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, “अनेकदा अशा घटनांमध्ये नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. मात्र, तुम्ही आमच्या कामगिरीची सकारात्मक बाजू लोकांसमोर मांडून आमचा गौरव केला. असा सत्कार आम्हाला भविष्यातही अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देतो.”
तसेच या कठीण प्रसंगी लोणावळा शहरातील सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी प्रवाशांसाठी पाणी, खाद्यपदार्थ, बिस्कीट पुडे व वाहने उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजप पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या वतीने त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानण्यात आले.






