ट्रिनिटीमध्ये शासणाच्या CGTMSME तर्फे उद्योजकता विकासासाठी कार्यशाळा उत्साहात संपन्न
कोंढवा : के जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, पुणे येथील शैक्षणिक संकुलामधील ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात “उद्योगधंद्यांमधील आर्थिक तरतूद” या विषयावरील विशेष कार्यशाळेचे आयोजन दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. केजे शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. कल्याणराव जाधव सर यांच्या संकल्पनेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांच्या पुढाकाराने ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस मा. पंकज आचरेकर (जनरल मॅनेजर, क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट, पुणे) तसेच मा. प्रशांत गवळी (सदस्य, युवा उत्थान संस्था, पुणे) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. विद्यार्थ्यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट (CGTMSME) म्हणजे काय, याची सविस्तर माहिती देणे, संबंधित योजना, कर्ज सुविधा व विविध शासकीय सवलतींबाबत मार्गदर्शन करणे तसेच नवउद्योजकतेसाठी उपलब्ध सरकारी सहाय्य व आर्थिक संधी समजावून सांगणे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले. सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांमध्ये स्टार्ट-अप व स्वयंरोजगाराची प्रेरणा निर्माण करणे आणि नोकरीतील संधींबाबत जागरूकता वाढवणे यावर विशेष भर देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या औचित्याने संस्थापक अध्यक्ष मा. कल्याणराव जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. आजच्या औद्योगिक युगात जागतिक दर्जाचे ज्ञान, उद्योजकतेची दृष्टी आणि आर्थिक तरतुदींचे भान आवश्यक आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून समाजातील आर्थिक संधींचा अभ्यास करून त्याचा योग्य वापर केल्यास यश निश्चित मिळू शकते. औद्योगिक आवड आणि त्यातील सखोल ज्ञान यांच्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य करता येते, असे त्यांनी नमूद केले. अशा कृतिशील उपक्रमांमुळे समाजात नवी औद्योगिक क्रांती घडू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच प्राध्यापकांनी शिक्षणासोबत आंतरराष्ट्रीय ज्ञान, नवे तंत्रज्ञान व आर्थिक व्यवस्थापनाचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित करावा, असे आवाहन केले.
माननीय प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांनी उद्योग, शिक्षण आणि रोजगार यांचा परस्पर संबंध स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीकडे न पाहता उद्योजकतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. कौशल्य विकास आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने CGTMSE योजनांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. “ज्ञानाचा पुरेपूर वापर करून प्रगती साध्य करा; यातूनच देशाच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लागेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
युवा उत्थान संस्था प्रतिनिधी मा. प्रशांत गवळी यांनी युवकांसाठी उपलब्ध स्वयंरोजगार संधी, प्रशिक्षण, मार्गदर्शन व सपोर्ट सिस्टीम याबाबत माहिती दिली. संस्था नवउद्योजकांना प्रत्यक्ष कशी मदत करते, याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण करण्यात आले.
यानंतर मा. पंकज आचरेकर यांनी “सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट योजना” या विषयावर सविस्तर सत्र घेतले. विद्यार्थी व नवउद्योजकांसाठी उपलब्ध कर्ज सुविधा, क्रेडिट गॅरंटी योजना, शासकीय अनुदाने व आर्थिक तरतुदी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. उद्योग सुरू करताना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर या योजनांद्वारे कशी मात करता येते, याचे विवेचन करण्यात आले. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विविध शंका मांडल्या. CGTMSE प्रतिनिधींनी त्यांना व्यावहारिक व समाधानकारक उत्तरे दिली. या संवादात्मक सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून आले.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. मान्यवर, अधिकारी व उपस्थित विद्यार्थी यांचे आयोजक प्रतिनिधींनी आभार मानले. आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. विराज बर्गे यांनी केले. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील आर्थिक नियोजनाची सखोल माहिती मिळून करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






