*IAS, IPS पेक्षाही भारी, तळेगावचा प्रणव होणार इंडियन आर्मीचा लेफ्टनंट*
तळेगाव दाभाडे :
केंद्रिय लोकसेवा आयोगातर्फे गेल्या एप्रिल मध्ये घेण्यात आलेली एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा(सीडीएस) आणि भारत सरकार संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने(एसएसबी) घेतलेल्या मुलाखतीनंतर तळेगाव दाभाडे येथील प्रणव शरद भेगडे याची भारतीय लष्करी अधिकारी प्रशिक्षणाच्या 119व्या तुकडीत शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी निवड झाली आहे. आयोगाने 24 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला. देशभरातून सुमारे पाच लाखावर उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यात प्रणवची निवड झाली आहे.
*आयएएस, आयपीएस ऐवजी आर्मी ऑफिसर व्हायचे माझे उद्दिष्ट* साध्य झाले आहे. एप्रिलमध्ये चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत सुरू होणा-या लष्करी अधिकारी प्रशिक्षणाच्या तुकडीत दाखल होणार असल्याचे प्रणवने बोलताना सांगितले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्याची लेफ्टनंट म्हणून भारतीय लष्करात नेमणूक होईल.
भारतीय लष्करी अकादमी, अधिकारी प्रशिक्षण अकादमी, भारतीय नौदल अकादमी आणि भारतीय वायुसेना अकादमीमध्ये कमिशन्ड ऑफिसर्सच्या भरतीसाठी गतवर्षी एप्रिलमध्ये युपीएससीने घेतलेल्या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती आणि आरोग्य चाचणी पश्चात निवड झालेल्या *347 जणांच्या अंतिम गुणवत्ता यादीत या मराठी शेतकरी कुटुंबातील मुलाने 30वे स्थान पटकावले* आहे. चोवीस वर्षाच्या या मराठी शेतकरी युवकाने, प्रणवने हे यश युपीएससीच्या दुस-या प्रयत्नात मिळवले आहे.
प्रणवचे शालेय शिक्षण येथील सेंट माऊंट अॅन स्कुलमध्ये झाले. त्यानंतर त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी आंबी(मावळ) येथील डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून प्राप्त केली. कराटे आणि शरीरसौष्ठव खेळात त्याला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. याबाबत त्याची आई, अर्चना भेगडे यांनी सांगितले, की प्रणव लहानपणापासून अत्यंत खटपटा, चपळ आणि अभ्यासातही हुशार. त्याच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. शेती आणि छोटासा व्यवसाय करताना प्रणव अभ्यासाबरोबरच मलाही मदत करायचा. करिअर काय करायचे त्यासाठी मी त्याला जे योग्य वाटेल ते करण्याची पूर्ण मोकळीक दिली. त्याने आज माझा विश्वास सार्थ केल्याचे मोठे समाधान वाटते.
कोविडकाळातील परिस्थितीमुळे आमच्या कुटंबासमोर अनेक आर्थिक आव्हाने उभी राहिली असतानाही आईने माझ्या आणि बहिण प्रणालीच्या शिक्षणात कशाचीही कमी पडू दिली नाही. तिचे कष्ट आणि समजूतदारपणा यामुळे मी अभ्यास, खेळात संतुलन साधू शकलो. इतर स्पर्धा परीक्षांचा विचार न करता थेट युपीएससीच्या सीडीएस परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. दिल्लीतील एका अकादमीत मी तयारी केली. परीक्षा सोपी गेली. एसएसबीच्या आठ जणांच्या पॅनलने माझी घेतलेली मुलाखत एक तास पंधरा मिनिटांची होती. दुस-या प्रयत्नात माझी निवड झाली.






