तलावात सांडपाणी सोडण्यावर बंदी घाला!” – नगरसेवक दीपक भेगडे यांचे प्रशासनाला निवेदन
तळेगाव दाभाडे : शहरातील पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या गंभीर प्रश्नावर नगरसेवक दीपक भेगडे यांनी आवाज उठवला आहे. तळेगाव दाभाडे गावातील तलावामध्ये थेट सांडपाणी सोडले जात असल्याने वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देत हे सांडपाणी तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळल्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढत असून दुर्गंधी, डासांची उत्पत्ती आणि विविध आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून पर्यावरणीय संतुलनही बिघडत आहे.
तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि अन्य संबंधित यंत्रणांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तलावातील पाण्याचे नियमित परीक्षण करून योग्य ती उपाययोजना करावी, तसेच सांडपाणी प्रक्रिया (Sewage Treatment) यंत्रणा कार्यान्वित करूनच पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगरसेवक दिपक भेगडे यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनामुळे तळेगावातील सांडपाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाची भूमिका काय राहते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






