श्री शिवशंभू स्मारक परिसरात अतिक्रमणाचा विळखा:कारवाईची मागणी
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील श्री शिवशंभू तीर्थ स्मारक परिसरात वाढत्या अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणांमुळे परिसराचा शिस्तबद्धपणा धोक्यात आला असून, यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री शिवशंभू स्मारक संस्थेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) यांना निवेदन देण्यात आले.
अवघ्या काही महिन्यांपूर्वी नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले श्री शिवशंभू तीर्थ स्मारक तळेगावच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात भर घालणारे ठरले आहे. छत्रपती शिव शंभू महाराजांच्या एकत्रित शिल्पामुळे या स्मारकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, अल्पावधीतच हे स्थळ नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. दररोज विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येथे भेट देत आहेत.
मात्र, वाढत्या गर्दीचा फायदा घेत स्मारक परिसरात अनधिकृत व्यवसायांनी पाय पसरले आहेत. सार्वजनिक व खाजगी जागांवर टपऱ्या, हातगाड्या, पथारी आणि शेड उभारण्यात आल्याने परिसरात अराजकता निर्माण झाली आहे. या व्यावसायिकांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून, ग्राहकांकडून रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्मारकाच्या परिसरात वाढलेली अस्वच्छता आणि अव्यवस्था यामुळे परिसराचे सौंदर्यही बाधित होत आहे. ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी मांसाहारी पदार्थ, मद्य तसेच गुटखा, पान, तंबाखू, सिगारेट आणि बिडी यांची विक्री होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्मारकाचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी अशा विक्रीवर संपूर्ण बंदी घालावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
संस्थेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्मारकाच्या किमान १०० मीटर परिसरात तीनही बाजूंनी करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ हटविणे आवश्यक आहे. नियमबाह्य दुकाने, टपऱ्या, शेड, पथारी व हातगाडी व्यवसायांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना प्रतिबंधित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही कारवाई झाल्यास परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, यामुळे तळेगावच्या सांस्कृतिक ओळखीचे जतन होण्यास मदत होईल, असेही संस्थेने स्पष्ट केले.
दरम्यान, प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी श्री शिव शंभू स्मारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भेगडे (पाटील), विनीत भेगडे, संजय बाविस्कर, रवींद्र काळोखे उपस्थित होते. नागरिकांमधूनही या कारवाईसाठी सकारात्मक प्रतिसाद उमटत आहे.






