तळेगाव दाभाडे येथील पीएमश्री संत ज्ञानेश्वर शाळेत स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांचा वचनविधी व स्कार्फ प्रदान सोहळा उत्साहात संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे : दिनांक 25 मार्च 2026 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण विभागातील पीएमश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. 6, येथे संत ज्ञानेश्वर स्काऊट पथक व संत मुक्ताई गाईड पथकातील विद्यार्थ्यांचा वचनविधी व स्कार्फ प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त प्राचार्य, व्ही.पी.एस. हायस्कूल लोणावळा तसेच सहाय्यक जिल्हा आयुक्त (स्काऊट) व प्रशिक्षण समुपदेशक, पुणे भारत स्काऊट आणि गाईड मा. प्रा. विजयकुमार तुकाराम जोरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मा. संजय चांदे, सर्व शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8.30 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने झाली. त्यानंतर संत ज्ञानेश्वर स्काऊट पथक व संत मुक्ताई गाईड पथकाच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी स्काऊट गाईड प्रार्थना सादर करण्यात आली. स्काऊट विद्यार्थी निसर्गराज शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच स्काऊट गाईड झेंडा गीत सादर करण्यात आले.

 

त्यानंतर प्रमुख अतिथींचे स्काऊट व गाईड सॅल्यूट तसेच स्काऊट टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

Advertisement

 

प्रमुख अतिथी मा. प्रा. विजयकुमार जोरी सर यांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. त्यानंतर त्यांचा स्काऊट स्कार्फ व पर्यावरणपूरक पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मुख्याध्यापक संजय चांदे सर यांच्या हस्ते उपस्थित पालकांचा स्काऊट गाईड स्कार्फ देऊन सन्मान करण्यात आला.

 

यानंतर स्काऊट विद्यार्थ्यांचा वचनविधी व स्कार्फ प्रदान सोहळा पार पडला. लायन, एलेफंट, हॉर्स व टायगर या स्काऊट संघांनी वचन स्थितीत उभे राहून स्काऊट वचन दिले. प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना स्काऊट स्कार्फ प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे संत मुक्ताई गाईड पथकातील जास्वंद, कमळ, गुलाब व सूर्यफूल या संघांच्या विद्यार्थिनींचा देखील वचनविधी व स्कार्फ प्रदान सोहळा संपन्न झाला.

 

कार्यक्रमानंतर शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. छाय गाडे यांनी स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी प्रा. विजयकुमार जोरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास, तिचे महत्त्व व विविध उपक्रमांची माहिती दिली. गाणी व आरोळ्यांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना स्काऊटचे नियम व उद्दिष्टे समजावून सांगितली. आजचे स्काऊट व गाईड हे उद्याचे जबाबदार नागरिक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट मास्टर श्री. संतोष बच्चे यांनी केले. गाईड कॅप्टन सौ. हर्षाली शेलार यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page