डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा शहरामध्ये स्वच्छता अभियान; 3616 किलो कचरा संकलित

SHARE NOW

लोणावळा : ज्येष्ठ निरुपणकार तथा महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा शहरांमध्ये एक मार्च रोजी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानामध्ये डोंगरगाव वाडी लोणावळा, तुंगार्ली लोणावळा, देवले, वेहेरगाव, कामशेत, नाणे, पवनानगर, आंबावणे येथील श्री बैठकांच्या 318 श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता. लोणावळा शहराच्या सात विविध भागांमधील बारा किलोमीटरचे रस्ते व रस्त्याच्या कडेचा परिसर झाडलोट करून रस्त्याच्या कडेला असलेले प्लास्टिक व इतर कचरा असा तब्बल 3616 किलो कचरा या स्वच्छता अभियानामध्ये संकलित करण्यात आला आहे. यामध्ये 627 किलो ओला कचरा व 2989 किलो सुका कचरा आहे.

ज्येष्ठ निरूपणकार तथा महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेसात वाजता पुरंदरे शाळा मैदानावर सर्व श्री सदस्य जमा झाले. त्या ठिकाणी सर्व सदस्यांची नोंद घेत प्रत्येकाला स्वच्छते साठीचे साहित्य मास्क व हँड ग्लोज वाटप करण्यात आले. या ठिकाणी लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, लोणावळा बाजारपेठ विभागाचे नगरसेवक सनी घोणे, अर्जुन पठारे लोणावळा नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख तुकाराम मोरमारे हे देखील उपस्थित होते.

Advertisement

उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे म्हणाले डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य हे खरे तर स्वच्छता दूत आहेत लोणावळा शहराला स्वच्छ करण्यामध्ये व स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये या श्री सदस्यांचा मोठा वाटा आहे. मागील अनेक वर्ष लोणावळा शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कार्यरत असते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. उपनगराध्यक्ष देविदास कडू यांनी देखील श्री सदस्यांच्या व प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करत लोणावळा शहरामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेले विविध सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक हे देखील या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते. लोणावळा शहराला स्वच्छ व सुंदर ठेवणे ही सर्व नागरिकांची सामूहिक जबाबदारी असून प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलल्यास निश्चितच लोणावळा शहर हे महाराष्ट्रातील एक स्वच्छ व सुंदर पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिकाला येईल असा विश्वास या उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.

 

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नौसेना बाग ते हनुमान टेकडी (2 किमी), नीलकमल थिएटर ते कैलास नगर (1किमी), लाकडाची वखार रस्ता (1 किमी), लोणावळा शहर पोलीस स्टेशन समोरील रस्ता (1 किमी), खोंडगेवाडी ते वर्धमान सोसायटी (2 किमी), कुमार रिसॉर्ट ते कैलास पर्वत (2 किमी), कुमार रिसॉर्ट ते भांगरवाडी (3 किमी) एवढे रस्ते या अभियाना अंतर्गत स्वच्छ करण्यात आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page