मावळ बाजार समितीत सत्तास्फोट; ९ राजीनाम्यांनी राजकारण ढवळून निघाले!

SHARE NOW

वडगाव (मावळ) – मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तासमीकरणांमध्ये मोठा उलथापालथ झाला असून, आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ पैकी ९ संचालकांनी राजीनामे दिल्याने तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

यापूर्वी संख्याबळ असूनही केवळ पाच संचालकांच्या जोरावर भाजपाने सभापतीपद पटकावल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या आमदार शेळके यांनी सर्व संचालकांना राजीनाम्याचे आदेश देत कठोर भूमिका घेतली.

मात्र, सर्वांनी आदेश पाळला नाही. ९ संचालकांनी राजीनामे दिले असताना ४ संचालक अजूनही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याने पक्षांतर्गत मतभेद उघड झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकजूट ढासळल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Advertisement

दरम्यान, भाजपाचे सभापती सुभाषराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील गट सध्या सत्तेत सक्रिय असून, या सर्व घडामोडींमुळे समितीतील सत्तासंतुलन अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.

सध्या १८ पैकी ९ सदस्य शिल्लक राहिल्याने कोरमचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर राजीनामे मंजूर झाले, तर समिती बरखास्त होऊन प्रशासक नेमण्याची शक्यता आहे. मात्र, एखाद्या सदस्याने राजीनामा मागे घेतल्यास हे संकट टळू शकते.

आता उर्वरित ४ संचालक काय भूमिका घेतात, यावरच पुढील राजकीय दिशा ठरणार असून, मावळमधील सत्तानाट्य आणखी रंगणार हे निश्चित!


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page