घोरवडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांचा महासागर! हजारोंच्या संख्येने भाविकांचे दर्शन, रात्रभर अभिषेक-आरती व हरिनाम संकीर्तन
सोमाटणे :
देहूरोड येथील डोंगरकपारीत वसलेले श्री क्षेत्र घोरवडेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पंचक्रोशीतील गावांसह पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील हजारो भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विशेष महाअभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे चार वाजल्यापासून पूजाविधींना सुरुवात झाली. दिवसभरात अंदाजे ४० ते ५० हजार भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले, अशी माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली.
रात्रभर मंदिर परिसरात भजन-कीर्तन, हरिनाम संकीर्तन तसेच विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. तसेच रात्री बारा वाजता महादेवाच्या पिंडीचा विशेष अभिषेक करण्यात आला. यावेळी घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विश्वस्त रघुवीर उद्धवराव शेलार, अखंड हरिनाम सप्ताह सोहळा समितीचे अध्यक्ष तुषार दत्तात्रय तरस, कार्याध्यक्ष आनंद विठ्ठलराव भेगडे, उपाध्यक्ष अभिजीत फुलाजी भेगडे, सचिव योगेश हनुमंत शेलार यांच्यासह अमोल दत्तात्रय राऊत, आनंदराव विष्णू गोपाळे, सचिन रामहरी शेलार, संजय नानाभाऊ शेलार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
वाढती गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. भक्तांना रांगेत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवक तैनात होते. तसेच पिण्याचे पाणी व आरोग्य सेवेचीही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.
विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, देहूरोड पोलीस स्टेशन, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तसेच देहूरोड व तळेगाव वाहतूक विभाग यांनी उत्तम नियोजन केल्यामुळे भाविकांना कोणताही त्रास झाला नाही, असे नागरिकांनी सांगितले. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे हा महाशिवरात्री उत्सव शांततेत आणि भक्तिभावात पार पडला.






