*दिव्यांगत्वाला न जुमानता ‘टीम इंडिया’ मध्ये मावळचा साजिद तांबोळी* झारखंडमध्ये होणाऱ्या भारत–नेपाळ टी–२० मालिकेसाठी निवड
देहूगाव :
मेहनत, जिद्द आणि स्वतःवरचा अविचल विश्वास—ही त्रिसूत्री जर एकत्र आली, तर अशक्यही शक्य होतं. याच जिद्दीचा आदर्श ठरला आहे मावळातील देहूरोडचा तरुण क्रिकेटपटू साजीद तांबोळी. शारीरिक अडथळ्यांना न जुमानता क्रिकेट मैदानावर आपल्या दमदार प्रदर्शनाची छाप उमटवत साजीदने थेट दिव्यांग टीम इंडियामध्ये ऑलराऊंडर म्हणून स्थान मिळवलं आहे.
अधिकृत निवड जाहीर
दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया (भारत सरकार नोंदणीकृत, नीति आयोग संलग्न) यांच्याकडून साजीदच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. भारत आणि नेपाळ यांच्यात १३ ते १५ डिसेंबरदरम्यान झारखंडमध्ये टी–20 आंतरराष्ट्रीय मालिका रंगणार असून, या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवणारा मावळचा हा तरुण आता टीम इंडियाची ‘ब्ल्यू जर्सी’ परिधान करणार आहे.
जिद्दीची कहाणी
जन्मतः उजव्या हाताच्या पंजावर अपंगत्व असतानाही साजीदने कधीच मर्यादा स्वीकारल्या नाहीत. डाव्या हाताने सर्व कामे करताना त्याने आपली क्रीडा शैलीही घडवली—लेफ्ट-आर्म मीडियम पेसर आणि डावखुरा फलंदाज म्हणून तो प्रतिस्पर्धी संघांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरला आहे.
राष्ट्रीय पातळीवरील सातत्यपूर्ण सराव, अनेक स्पर्धांतील उल्लेखनीय यश आणि मैदानावरील जिद्दीच्या जोरावर साजीदने स्वतःसाठी टीम इंडियाचा मार्ग प्रशस्त केला. यापूर्वी त्याने महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करताना देखील चमकदार कामगिरी बजावली आहे.
आधार कणखर, ध्येय उंच
“अडथळे कितीही मोठे असले तरी मनात सामर्थ्य असेल, तर आकाशालाही स्पर्श करता येतो,” याच विचाराचं जिवंत उदाहरण म्हणजे साजीद तांबोळी. आपल्या संघर्षातून त्याने केवळ स्वतःची ओळख निर्माण केली नाही, तर अनेक दिव्यांग तरुणांसाठी प्रेरणादायी वाटही खुली केली आहे.






