क्रिकेट सामना पाहताना किरकोळ कारणावरून वाद; डोक्यात दगड घालून तरुणाचा खून, आरोपी अटकेत

SHARE NOW

सोमाटणे – सोमाटणे फाटा येथे पुणे–मुंबई महामार्गालगत असलेल्या मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाटा येथील मैदानावर स्थानिक तरुणांचा क्रिकेट सामना सुरू होता. सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणांची गर्दी जमली होती. याच वेळी सामना पाहणाऱ्या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वाद अधिक तीव्र झाला असता मृत तरुणाने आरोपीला शिवीगाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने जवळच पडलेला दगड उचलून सुमारे २० ते २५ वर्षे वयाच्या त्या तरुणाच्या डोक्यात जोरात मारला.

Advertisement

 

डोक्यात दगड लागल्याने तरुण गंभीर जखमी झाला आणि रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार अनेक तरुणांच्या समक्ष घडल्याने मैदानावर एकच खळबळ उडाली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

 

घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपीला ताब्यात घेतले. सनी प्रमोद चव्हाण (वय २४, रा. शिरगाव, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

दरम्यान, खून झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

 

या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रवींद्र खामगळ करीत आहेत. क्रिकेट सामन्यासारख्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सोमाटणे फाटा परिसरात शोककळा पसरली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page