*तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढणेची कार्यवाही पूर्ण*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हदीतील असलेले अनधिकृत जाहिरात फलकांची संरचनात्मक लेखापरीक्षण तपासणी करण्यात येऊन आढळून आलेल्या अवैध जाहिरात फलक निष्कासनाची कार्यवाही करून संबंधितावर नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना महाराष्ट्र शासनाद्वारे प्राप्त झाल्या होत्या.
त्यानुषंगाने नगरपरिषदेच्या बीट निरीक्षकांमार्फत स्थळपाहणी करून तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील ३२ जाहिरात फलक अनधिकृत आढळून आले असून नगरपरिषदेमार्फत सदर होर्डिंग मालकांना अनधिकृत होर्डिंग त्वरित काढून घेणेबाबत नोटीस बजाविण्यात आल्या होत्या,
सद्यस्थितीत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढणेची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. शहरामधील ३२ अनधिकृत होर्डिंगपैकी नगरपरिषदेने दिलेल्या निर्देशानुसार ७ होर्डिंग्ज मालकांनी स्वतःहून आपले अनधिकृत होर्डिंग काढून घेतलेले असून उर्वरित २५ अनधिकृत होर्डिंग नगरपरिषदेच्या नगररचना व अतिक्रमण विभागामार्फत धडक कार्यवाही करून काढून घेतले असून यामध्ये निघालेले लोखंडी सांगाडे नगरपरिषदेने जप्त करून घेतले आहेत. त्यामुळे शहरातील सर्व होर्डिंग्ज भुई सपाट केलेले आहेत अशी माहिती नगरपरिषदेमार्फत देण्यात आली आहे.
सदर धडक कार्यवाहीमध्ये नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली असून बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न निकाली काढला आहे. याबाबत तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या कार्यवाहीमध्ये सहाय्यक नगररचनाकार विश्वजित कदम, नगररचना सहाय्यक गणेश कोकाटे, विरेंद्र नारगुंडे, मिळकत विभाग प्रमुख जयंत मदने, उद्यान पर्यवेक्षक तथा अतिक्रमण विभाग सहाय्यक विशाल भिंड, भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन तसेच अतिक्रमण पथक, सर्व बीट निरीक्षक यांनी महत्वाची भूमिका बजावली.