सोहम चाकणकर ठरला “फिनिक्स श्री २०२४” चा मानकरी
पिंपरी, पुणे (दि. २३ एप्रिल २०२४)
सांगवीतील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्याच्या सोहम चाकणकर या खेळाडूने फिनिक्स श्री २०२४ हा किताब पटकावला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे औचित्य साधून सांगवीतील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या सांगवीतील एकता चौकात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन भाजप नेते सचीन साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फिनिक्स संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संतोष कांबळे, हर्षल ढोरे, इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशनचे खजिनदार राजेश सावंत, पुणे शहर बॉडी बिल्डिंगचे अध्यक्ष राजेंद्र नांगरे, बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मनोज झरे, दिलीप धुमाळ, मनोज फुलसुंगे आदी उपस्थित होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची विशेषतः तरूणांची तुडुंब गर्दी झाली होती. स्पर्धेत ८४ स्पर्धक सहभागी झाले होते. प्रसिध्द मराठी व हिंदी गाण्यांच्या ठेक्यावर खेळाडूंनी सादरीकरण केले. चाकणकर याने फिनिक्स श्रीचा किताब पटकावला. तर, आकाश दमडल (उपविजेता), परिक्षित भालेराव (बेस्ट पोजर), दिलीप राजवाडे (बेस्ट इम्प्रुव्हर) ठरला. वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षीसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश कांबळे यांनी केले. विक्रम कदम यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी राहुल विधाते, श्रीकांत चव्हाण, रवींद्र यादव, नेताजी चिवरे यांचे विशेष सहकार्य लाभले