श्री बनेश्वर महादेवांचा चंदनउटी सोहळा व मोगरा महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न.
तळेगाव दाभाडे :
“अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय मुहूर्तावर” श्री बनेश्वर मंदिर तळेगाव दाभाडे येथील श्री बनेश्वर महादेवांचा चंदन उटी सोहळा व एकतारी भजनाचा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावणात पार पडला. या वेळी मंदिरातील मुर्तीला ०५ किलो चंदनाचा लेप लावला होता व मोगरा फुलांनी सजावट करून मोगरा महोत्सव पार पडला . तसेच विविध प्रकारच्या १०० किलो फुलांनी आकर्षक मंदिर गाभारा व मंदिर सजावट केली होती. बनेश्वर सेवा मित्र मंडळ व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे मित्र परिवार यांच्या वतीने दरवर्षी या मुहूर्तावर सोहळा आयोजीत केला जातो. श्रीमंत सरदार सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार व श्रीमंत सरदार सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकारकालीन असलेल्या या मंदिरात आयोजीत चंदनउटी सोहळ्याचे हे सलग २४ वे वर्ष आहे.
अक्षय्य तृतीया हा एक पवीत्र मुहूर्त आहे. या दिवशी केलेल्या शुभारंभाचे फल हे अक्षय्य राहते. साडेतीन मुहूतपैिकी एक मुहूर्त असलेला हा दिवस म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया होय. याच दिवशी भगवान विष्णुंचा सहावा अवतार असेलल्या भगवान परशुरामांचा जन्म झाला. याच दिवशी व्यासमुनिंनी श्री गणेशाला महाभारत सांगुन त्याच्याकडुन लेखन करवुन घेतले. अनादीकाळापासुन हा सण साजरा केला जात असुन, महाभारत, स्कंदपुराण, भविष्यपुराण आदी ग्रथांत या सणाचा उल्लेख आढळतो. या तिथीला दानधर्म, होमहवन, परोपकार, पुजा, भजन केले तर ते कधीही क्षयाला जात नाही. म्हणुन या दिवशी दानधर्म व नविन कार्याला सुरूवात केली जाते. चैत्र व वैशाख या दोन महिन्यांतला अक्षय तृतीया हा दुवा आहे. वैशाखाच्या झळा असहय होत असताना अक्षय तृतीयेचा गाभा लक्षात घेऊन पाण्याचे कलश दान केले जातात व मंदिरातील मुर्तीना चंदनाचा लेप लाऊन शीतल करतात .
सकाळी ११ ते सायंकाळी ६ – चंदन उटी सोहळा व रात्री ७.३० वाजता महाआरती झाली व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री ८ नंतर एकतारी भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी तळेगाव शहरातील भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.
सदर कार्यक्रमास मा. नगराध्यक्षा श्रीमंत सरदार अंजलीराजे दाभाडे सरकार ,श्रीमंत सरदार चंद्रासनराजे दाभाडे सरकार, मा. उपनगराध्यक्ष श्रीमंत सरदार सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे सरकार, मा. अध्यक्ष पी. डी .सी .सी बँक बबनराव भेगडे, PMRDA सदस्य- शहराध्यक्ष तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस संतोष भेगडे, मा. उपनगराध्यक्ष गणेश काकडे, कार्याध्यक्ष तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस आशिष खांडगे, अध्यक्षा तळेगाव शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस शैलजाताई काळोखे, मनीषाताई रघुवंशी, अबोलीताई ढोरे, डी.आर.कदम आदी मान्यवर व तळेगाव शहरातील ३००० हुन अधिक भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याचे नियोजन बनेश्वर सेवा मंडळ व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी केले होते.