राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा पुणे जिल्हा पुरूष तर भंडारा जिल्हा महिला संघाला विजेतेपद

SHARE NOW

पिंपरी, पुणे (दि. ३० एप्रिल २०२४) – महाराष्ट्र राज्य अँमॅच्युअर नेटबॉल संघटनेच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी, पुणे जिल्हा नेटबॉल संघटना व विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते २९ एप्रिल या कालावधीत १७ वी वरीष्ठ गट (पुरुष व महिला) राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा पुरुष संघ आणि भंडारा जिल्हा महिला संघाने विजेतेपद पटकावले.

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पुणे जिल्हा संघाने भंडारा जिल्हा संघाला २५/१५ गुण फरकाने व महिला गटामध्ये भंडारा जिल्हा संघाने धुळे संघाला १५/११ गुण फरकाने पराभव केला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील २५ पुरुष संघ व २० महिला संघानी सहभाग घेतला.

तत्पूर्वी झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यामध्ये पुणे जिल्हा संघाने गोंदिया जिल्हा संघाला, भंडारा जिल्हा संघाने संभाजीनगर जिल्हा संघाला, महिला गटामध्ये भंडारा जिल्ह्याने परभणी जिल्ह्याला व धुळे जिल्ह्याने चंद्रपूर जिल्ह्याला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

Advertisement

स्पर्धेचा निकाल :- पुरुष गट – विजयी पुणे जिल्हा, उपविजेता – भंडारा जिल्हा, तृतीय क्रमांक – गोंदिया जिल्हा ; महिला गट – विजयी भंडारा जिल्हा, उपविजयी – धुळे जिल्हा, तृतीय क्रमांक – परभणी जिल्हा.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र अँमॅच्युअर नेटबॉल संघटनेचे सचिव डॉ. ललित जीवानी, पुणे जिल्हा नेटबॉल संघटनेचे सचिव मानसिंग वाबळे, पीसीसीओईचे एसडीडब्ल्यू असो. डीन डॉ. अजय गायकवाड, विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाऊंडेशनचे सदस्य पुरुषोत्तम गोळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेतील विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचे आयोजन पीसीसीओईचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे, पुणे जिल्हा नेटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष समीर सिकीलकर, अश्वजीत सोनवणे, सुनील मंडलिक यांनी केले.

————————————————–


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page