कालिका बापट यांच्या तीन पुस्तकांचे मुंबईत प्रकाशन
मुंबई :
गोमंतकीय लेखिका, कवयित्री, पत्रकार प्रिया कालिका बापट यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन मुंबईत एका विशेष सोहळ्यात मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते करण्यात आले. “हे हृदया” , “मेंदीच्या पानावर” आणि “अवघा रंग एक झाला” या ललित लेखसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले.
कोमसाप गिरगाव शाखा आणि चिं.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डिंपल प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या निवडक खानोलकर संकलन “नक्षत्र देणं” ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पत्रकार प्रिया कालिका बापट यांना अध्यक्ष या नात्याने निमंत्रित करण्यात आले होते. याच सोहळ्यात त्यांच्या ललित लेखसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. आरती प्रभूंच्या कन्या कलामंच अंकाच्या संपादिका, साहित्यिक हेमांगी अरविंद नेरकर, साहित्यीक नमिता किर, डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे, गिरगाव कोमसापचे अध्यक्ष डॉ. मनोज वराडे यांच्या हस्ते लेखसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला महाराष्ट्रातील प्रथितयश आणि दिग्गज साहित्यिक उपस्थित होते. रामदास खरे, लता गुठे, मेघना साने, संगीतकार गायिका धनश्री गणात्रा, आरजे अपर्णा डोळे, डॉ. पल्लवी बनसोडे परुळेकर, पत्रकार रेखा भेगडे, प्रकाशिका ज्योती कपिले, डॉ.मनोज बराडे आदी मान्यवर साहित्यिक यावेळी उपस्थित होते. “हे हृदया” या लेखसंग्रहाला किशोर मासिकाचे संपादक, साहित्यिक किरण केंद्रे यांनी प्रस्तावना दिली आहे. तर “मेंदीच्या पानावर” या लेखसंग्रहाला लेखिका हेमांगी नेरकर यांनी प्रस्तावना दिली आहे. तसेच “अवघा रंग एक झाला” या पुस्तकाला कवयित्री, लेखिका सुवर्णा जाधव यांनी प्रस्तावना दिली आहे. प्रिया कालिका बापट यांची “प्रभू पदास नमित दास” हे गोव्यातील नाट्यसंस्थांविषयक, “सृजन प्रेरणा” आणि “सृजन ऊर्जा” ही महिला उद्योजिकांच्या मुलाखतींचे पुस्तके, उत्सव थेंबांचा, रे मना, माझ्या आयुष्यातल्या तुझ्या कविता, मनमधुरा, मनचकोरा, मनमोही काव्यसंग्रह, तसेच अनंतात्मन अनंतम, मुंगी उडाली आकाशी आणि आनंदडोह ही पुस्तके आहेत. त्याशिवाय “सृजन डॉक्टर स्पेशल”, “अन्नपूर्णा” आणि “सृजन श्रावण” हे विशेषांक त्यांनी संपादित आणि प्रकाशित केले आहेत. या सोहळ्यात आरती प्रभू यांच्या कवितांचे सादरीकरण तसेच त्यांची अजरामर गीते सादर करण्यात आली. आरजे मेघना साने यांनी हेमांगी नेरकर यांची मुलाखत घेऊन कविश्रेष्ठ आरती प्रभू यांचा साहित्य प्रवास उलगडविला.