*बलसागर भारतासाठी योगविद्या आत्मसात करा*
तळेगाव स्टेशन :
योगविद्या योगायोगाने संभवत नाही. त्यासाठी योग्यप्रकारे यत्न करावे लागतील. साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे “बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’, हे करण्याची मोठी जबाबदारी विद्यार्थ्यांवर असल्याने त्यांनी योगास आत्मसात करावे, असे प्रतिपादन योगाचार्य अतुल आर्य यांनी येथे केले. प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील उपस्थित होते.
विश्वयोग दिनानिमित्त कडोलकर कॉलनीतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गुरुकुलमध्ये मावळ पतंजली योग समितीतर्फे मुलांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. योगविद्या ही शरीरासोबत मन, चित्त, स्वभाव, सामाजिक व्यवहार आणि आचारविचारांचे आरोग्य उत्तम राखणारी जीवनपद्धती असल्याचे योग शिक्षक दिनेश कोतुळकर म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांना नित्याची सहजसोपी योगासने शिकविण्यात आली.
कार्यक्रमास सावरकर गुरुकुलचे अध्यक्ष सुरेश दाभाडे, व्यवस्थापक दादा शिरोडकर, संचालक प्रदीप टेकवडे यांच्यासह विठ्ठल कदम, दयानंद हिबारे, अमोल राक्षे, सुभाष करपे, अभिजीत शेलार आणि संदीप देवरे आदी स्थानिक उपस्थित होते. दादा शिरोडकर यांनी आभार मानले.
सावरकर गुरुकुल मध्ये योगाचार्य अतुल आर्य यांचा सत्कार करताना पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, दादा शिरोडकर आणि पदाधिकारी